संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठाने लस विकसित केली आहे. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पात पुण्याची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था भागीदार आहे. त्यामुळे अन्य लसींच्या तुलनेत सिरमची ही लस भारतीयांना लवकर उपलब्ध होईल.

पहिल्या फेजचा काय आहे निष्कर्ष?
सोमवारी लॅन्सट जर्नलमध्ये या लसीच्या पहिल्या फेजच्या मानवी परीक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला. वैद्यक क्षेत्रातील सर्वांचेच या अहवालाकडे लक्ष लागले होते. ऑक्सफर्डने विकसित केलेली ही लस मानवी शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात यशस्वी ठरली आहे तसेच या लसीने शरीरात किलर टी-सेल्सची निर्मिती सुद्धा केली.

भारतीयांना कधी मिळणार लस?
पहिल्या फेजचे निष्कर्ष खूपच समाधानकारक असल्यामुळे बाजारात सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या प्रकल्पात भागीदार असल्यामुळे लवकरात लवकर म्हणजे आपल्याला ही लस कधीपर्यंत मिळणार? असा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली ही लस भारतात नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकते तसेच या लसीची किंमत १ हजार रुपयापर्यंत असेल अशी माहिती सिरमकडून देण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लसीचे भारतातील नाव कोविशिल्ड आहे. क्लिनिकल ट्रायल सुरु असतानाच कोविशिल्डची निर्मिती सुरु झाली होती. सिरमकडून एकूण उत्पादन केल्या जाणाऱ्या लसींपैकी ५० टक्के लसी या भारतासाठी असतील अशी माहिती सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.