करोना आणि टाळेबंदीच्या आरंभीच्या कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेचा निराशाजनक प्रवास मावळत्या वर्षांपूर्वीच सुरू झाल्याचे शुक्रवारच्या सरकारच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट झाले.

गेले वित्त वर्ष, २०१९-२० मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ४.२ टक्के  असे गेल्या तब्बल ११ वर्षांच्या तळातील नोंदले गेले आहे, तर आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत देशाचा विकास दर घसरून ३.१ टक्के  राहिला.  करोनाबाधितांची वाढती संख्या समोर येत असताना मार्चच्या शेवटी देशात टाळेबंदीचा पहिला टप्पा लागू झाला. चौथ्यांदा वाढविण्यात आलेला टाळेबंदीचा टप्पा आणखी वाढण्याची भीती आहे. चालू आर्थिक वर्षांच्या विकासदराबाबत अर्थतज्ज्ञांमध्ये भिन्न मते असली तरी गुंतवणूक आणि वस्तू व सेवेसाठीची ग्राहकांची मागणी रोडावल्याचे शेवटच्या तिमाही तसेच एकू णच गेल्या आर्थिक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर ५.७ टक्के, तर २०१८-१९ आर्थिक वर्षांत ६.१ टक्के होता. यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेने २००८-०९ मध्ये ३.१ टक्के  अशी किमान अर्थ हालचाल नोंद केली होती. विशेष म्हणजे हा अमेरिके तील सब प्राइमरूपी जागतिक मंदीचा कालावधी होता.

झाले काय?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या सुधारित आकडेवारीनुसार, गेल्या वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विकास दर ५.२ टक्के , दुसऱ्या तिमाहीत ४.४ टक्के , तर तिसऱ्या तिमाहीत तो ४.१ टक्के  नोंदला गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.

स्थिती काय? गेल्या तिमाहीत तुलनेत कृषी क्षेत्राची थेट ५.९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती अवघी १.६ टक्के  होती, तर निर्मिती क्षेत्राची वाढ यंदा १.४ टक्क्यांपर्यंत, बांधकाम क्षेत्राची २.२ टक्क्क्यांपर्यंत घसरली आहे. गेल्या तिमाहीत बहुपयोगी सेवा, स्थावर मालमत्ता, वित्त, दळणवळण, आदरातिथ्य क्षेत्रालाही फटका बसला.