‘पद्मावत’ या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाला आता हिंसक वळण लागले आहे. अहमदाबादमध्ये श्री करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. सुमारे दीडशे दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे यात नुकसान झाले आहे. तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राममध्ये पोलिसांनी कलम १४४ लागू केला आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पद्मावत’ हा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हा चित्रपट आता देशभरात प्रदर्शित होणार असून करणी सेनेनेही विरोध आणखी तीव्र केला आहे.

अहमदाबादमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री तीन मॉल आणि एका चित्रपटगृहाला लक्ष्य केले. मॉल बाहेरील दुचाकी आणि चार चाकीची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी दुचाकीला आग लावण्यात आली. तर अॅक्रोपोलीस आणि हिमालय मॉल येथील मल्टीप्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळ जाळपोळ करण्यात आली. ‘मॉलमध्ये अडकलेल्या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही’ असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबादमधील करणी सेनेच्या नेत्यांनी मात्र या तोडफोडीचा संघटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. पण कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच’ असे त्यांनी सांगितले. गुजरात सरकारने पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, राज्यातील चित्रपटगृह मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पटेल यांनी दिली.

हरयाणातील गुरुग्राममधील जिल्हा प्रशासनाने रविवारपर्यंत कलम १४४ लागू केला आहे.शहरात ४० मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृह असून तिथे कलम १४४ लागू असेल, असे पोलिसांनी सांगितले. राजस्थानमध्येही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरील बंदी उठवण्याची अप्रत्यक्षपणे मागणी करणारी राजस्थान व मध्य प्रदेश सरकारची याचिका फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले पाहिजेत हे लोकांना समजायला हवे, यात आम्ही आदेश दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आता राज्यांची आहे, असे सांगून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पद्मावतच्या देशव्यापी प्रदर्शनाचा मार्ग प्रशस्त केला होता.