अनेक वादांमध्ये अडकलेल्या ‘पद्मावत’ सिनेमाचा वाढता विरोध अधिकच तीव्र झाला आहे. देशभरात ठिकठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलने केली जात आहेत. अनेक सिनेमागृहांची तोडफोड करण्यात आल्याने हा सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात प्रदर्शित न करण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशनने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात पंढरपूरातही पद्मावत सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.

पद्मावत सिनेमा उद्या, २५ जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. यापार्श्वभूमीवर हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात बुधवारी हिंसक आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते. तसेच अनेक बस गाड्याही पेटवून दिल्या. दिल्लीतील एनसीआर भागातही मोठ्या प्रमाणावर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. गुरुग्राममध्ये तर आंदोलकांनी एका स्कूलबसला टार्गेट करीत त्यावर दगडफेक केली. या बसमधून शाळेची मुले प्रवास करीत होती. या भागात रविवारपर्यंत सिनेमागृहांत २०० मीटर अंतरापर्यंत १४४ कलमांतर्गंत जमावबंदी करण्यात आली आहे.

मुंबईत विविध ठिकाणांहून आलेल्या करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच गुजरातमध्ये मंगळवारी अहमदाबादेत मल्टीप्लेक्समध्ये तोडफोड करण्यात आल्याने ५० लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडियाने पद्मावत सिनेमा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था ७५ टक्के मल्टीप्लेक्स मालकांचे प्रतिनिधीत्व करते.

गुजरातमधील सिनेमागृहांच्या मालकांनी हा वाद संपुष्टात येईपर्यंत कोणत्याही मल्टिप्लेक्स आणि एक पडदा चित्रपटगृहांत पद्मावत सिनेमा न लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजस्थान राजपूत समाजाच्या १९०० महिलांनी जौहर करण्याची धमकी दिल्याने चितौडगड येथील करणी सेनेच्या प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी सांगितले की, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील चित्रपट वितरकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आश्वासन दिले आहे.