अमेरिकेने अफगाणिस्तानात तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या अड्डय़ांवर तसेच त्यांचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला याच्यावर हल्ले करावेत, असे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी म्हटले आहे.
जनरल राहील शरीफ यांनी अफगाणिस्तान मोहिमेचे कमांडर जॉन निकोलसन व अमेरिकेचे अफगाणिस्तान व पाकिस्तानविषयक कामकाज प्रतिनिधी रिचर्ड ओलसन यांच्या समवेत बैठकीत ही सूचना केली आहे.
रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात जनरल राहील शरीफ यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या अड्डय़ांवर तेसच मुल्ला फजलुल्लाह याच्यावर अमेरिकेने हल्ले करावेत. रॉ व एनडीएस यांसारख्या संस्था देशात दहशतवाद पसरवित असल्याचा आरोप त्यांनी केला.
२१ मे रोजी पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे अफगाणिस्तान तालिबानचा प्रमुख मुल्ला मन्सूर याच्यावर अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या ड्रोन विमानांनी हल्ले केले होते त्यात तो ठार झाला. त्यानंतर सार्वभौमत्वाचा भंग करून पाकिस्तानी हद्दीत घुसून हल्ले केल्यानंतर अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनल्यानंतर अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तान भेटीवर आले होते, त्यावेळी राहील शरीफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अमेरिकेने पाकिस्तानी हद्दीत घुसून जे ड्रोन हल्ले केले तो सार्वभौमत्वाचा भंग होता याबाबत शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशातील परस्पर विश्वासाचा त्यामुळे भंग झाला तसेच ऑपरेशन झर्ब ए अज्ब या मोहिमेवर त्याचा विपरित परिणाम झाला असे त्यांनी सांगितले. तीस लाख निर्वासित, बंदिस्त नसलेली सीमा व आंतरआदिवासी संपर्क अशी अनेक आव्हाने पाकिस्तानपुढे आहेत असे असताना अफगाणिस्तानातील अस्थिरतेसाठी पाकिस्तानला दोष देणे योग्य नाही. अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया शाश्वत मार्गाने घडवण्यासाठी पाकिस्तान वचनबद्ध आहे असे ते म्हणाले. अमेरिका, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान या चार देशांचा चतुष्कोण समन्वय गट यासाठी स्थापन करण्यात आला आहे. तत्पूर्वी अमेरिकी उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज यांची भेट घेतली. २१ मे रोजी मन्सूरला ठार मारण्यासाठी जसा हल्ला केला तसा हल्ला पुन्हा केल्यास द्विपक्षीय संबंधांवर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अझीज यांनी दिला आहे.