पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. १३ आणि १४ जूनला किरगिझस्तानात येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान मोदींचे विमान पाकिस्तानातून जाऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. किरगिझस्तान बीश्केक येथे जाण्यासाठी मोदींच्या विमानाला पाकिस्तानातून जाण्याची परवानगी द्यावी यासाठी भारताने विनंती केली होती.

इम्रान खान सरकारने भारत सरकारच्या विनंतीला प्राथमिक मंजुरी दिली आहे. आवश्यक औपचारीक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारला याबद्दल कळवण्यात येईल. शांतता चर्चेच्या प्रस्तावाला भारत सकारात्मक प्रतिसाद देईल अशी पाकिस्तानला अपेक्षा आहे.