पाकिस्तानमधील वायव्य प्रांतामधील खैबर जिल्ह्य़ातील मेहेरबान कलय येथे तालिबान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाचा खबऱ्या असल्याच्या आरोपावरून एकाचा सार्वजनिकरीत्या शिरच्छेद केला. शुक्रवारच्या या घटनेनंतर सायंकाळपर्यंत मृतदेह न हलवण्याची तंबीही दहशतवाद्यांनी स्थानिकांना दिली होती. हा भाग तेहरीक-ए-तालिबानच्या नियंत्रणाखाली होता. तसेच काही प्रमाणात लष्कर-ए-इस्लाम या गटाचा प्रभावही या परिसरावर होता.लष्करचा म्होरक्या मंगलबाघ यांच्या आवाहनानंतर हे दोन्ही गट एकत्र आले. सुरक्षा दलाने १६ ऑक्टोबरला दहशतवाद्यांच्या विरोधात खैबर १ ही मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो नागरिकांनी या भागातून पलायन केले आहे. सिपाह व मलीकदीन खेल परिसरातून घरे रिकामी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शनिवारपर्यंत दिलेली मुदत वाढवली.