पाकिस्तानात छापलेल्या बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशी तस्करी रोखण्यासाठी कडक नजर ठेवण्याचे संकेत महसूल गुप्तचर संचालनालयाने दिले आहेत.
पाकिस्तानात छापलेल्या बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीसाठी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या देशांमधून तस्करांनी नवीन मार्ग शोधले आहेत, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ या कालावधीत बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी होण्याच्या तब्बल पाच घटना घडल्या असून जवळपास १५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा भारतात आणताना जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तचर संचालनालय आणि आपल्या शेजारी देशांमधील गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत तीन पाकिस्तानी नागरिकांसह आठ जणांना पकडण्यात आले.
२०१२-१३ मध्ये बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करण्याच्या आठ घटना घडल्या आहेत. यामध्ये १४ लोकांना पकडण्यात आले असून त्यांपैकी पाच पाकिस्तानी नागरिक आहेत. या घटनांमध्ये ६.३५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांतूनही बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा आणि खऱ्या नोटा यांमधील फरक समजणे निश्चितच अवघड आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीत वाढ होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे याबाबत कडक नजर ठेवून तस्करी रोखण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.