भारतीय वायुदलाने पुन्हा एकदा पाकिस्तानी वायुदलाचे इरादे नेस्तनाबुत केले आहेत. पाकिस्तानने रविवारी पहाटे 3 च्या दरम्यान भारताच्या सीमेलगत पाकिस्तानने चार लढाऊ F-16 विमानं आणि एक भलं मोठं UAV (Unmanned Areial Vehicle) पाठवलं होतं. या सगळ्यांना पिटाळून लावण्यात भारतीय वायुदलाने यश मिळवलं आहे. सुखोई विमाने आणि मिराज विमानांच्या मदतीने पाकिस्तानची विमाने आणि UAV पिटाळून लावली आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वायुदलाला रडारवर पाकिस्तानच्या चार लढाऊ विमानांची अर्थात F-16 आणि UAV ची सूचना मिळाली. पंजाबच्या खेमकरण सीमेजवळ ही विमाने येत असल्याचे समजले ज्यानंतर तातडीची कारवाई करत भारतीय वायुदलाने ही विमाने आणि UAV पिटाळून लावली.

सुखोई-30 आणि मिराज या लढाऊ विमानांचा तातडीने वापर करत भारतीय वायुदलाने या विमानांना परतवून लावले. भारताने दिलेले प्रत्युत्तर पाहून ही विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत परतली. भारतीय सेनेची संवेदनशील ठिकाणं कोणती आहेत याचा तपास करण्यासाठी ही विमानं आली असावीत असा अंदाज व्यक्त होतो आहे. भारतीय वायुदलाकडून या घटनेची कसून चौकशी केली जाते आहे.

बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान धाबं दणाणलं आहे. त्यानंतर कुरापत काढण्याची एकही संधी पाकिस्तानने सोडलेली नाही. मात्र भारताकडून पाकिस्तानच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिले जाते आहे. आता पहाटे तीनच्या सुमारास आलेली लढाऊ विमानेही भारताने परतवून लावली आहेत.