इजिप्तच्या हवाई दलाने भंगारात काढलेली मिराज-V फायटर विमाने पाकिस्तान विकत घेणार आहे. इजिप्तकडून मिराज-V फायटर विमाने विकत घेण्याची पाकिस्तानची योजना आहे. अशी ३६ विमाने विकत घेण्यासाठी पाकिस्तानची इजिप्त बरोबर चर्चा सुरु आहे. मिराज ही मूळची फ्रेंच बनावटीची विमाने असून डासू कंपनीने सुद्धा या विमानांचे उत्पादन थांबवले आहे. इजिप्तच्या हवाई दलातूनही ही विमाने केव्हाच निवृत्त झाली आहेत.

पाकिस्तानला या फायटर विमानांमध्ये सुधारणा करुन पुन्हा लढण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. इंडियन एअर फोर्सकडे असलेल्या मिराज-२००० विमानांबरोबर मिराज-V ची तुलना सुद्धा होऊ शकत नाही. फेब्रुवारी महिन्यात बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी भारताने मिराज-२००० विमानांचा वापर केला होता. पुढच्या काही दिवसात इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात पहिले राफेल फायटर विमान दाखल होईल.

फ्रान्सच्याच डासू कंपनीने या विमानाची निर्मिती केली आहे. या विमानाच्या समावेशाने भारताची ताकत कैकपटीने वाढणार आहे. २०२२ पर्यंत भारताला फ्रान्सकडून सर्वच्या सर्व ३६ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. ही विमाने एअर टू एअर मीटीओर, मध्यम पल्ल्याची एमआयसीए आणि स्काल्प मिसाइल्सची राफेल सुसज्ज असतील.

पाकिस्तानकडे एफ-१६, जे-७ आणि जेएफ-१७ या फायटर विमानांबरोबर मिराज-V ची ९२ आणि मिराज-३ ची ८७ विमाने आहेत. पाकिस्तानला चांगले रडार्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटसनी सज्ज असलेली मिराज-V विमाने इजिप्तकडून हवी आहेत. रोझ प्रोजेक्टतंर्गत पाकिस्तान त्यांच्याकडे असलेल्या मिराज-३ आणि मिराज-V विमाने अपग्रेड करत आहे.