जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार करून सीमेवर तणाव निर्माण करणाऱ्या पाकिस्ताननेच उलट भारताला इशारा दिला आहे. काश्मीरच्या मुद्द्याला युद्धाचे स्वरुप दिल्यास ते तुमच्यासाठी उचित ठरणार नाही, असा धमकीवजा इशारा पाकिस्तानचे हवाई दलाचे चीफ मार्शल सोहेल अमन यांनी दिला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर बुधवारी भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत केलेल्या कारवाईत पाकच्या एका अधिकाऱ्यासह तीन सैनिक मारले गेले. त्यानंतर हवाई दलाच्या प्रमुखांनी ही धमकी दिल्याची बाब समोर आली आहे.

नियंत्रण रेषेजवळ भारताकडून बुधवारी करण्यात आलेल्या गोळीबारात तीन पाकिस्तानी सैन्यांसह १२ नागरिकांचा मृत्यू झाला, असा आरोप पाकचे हवाई दल प्रमुख सोहेल अमन यांनी केला. भारताने स्वतः संयम बाळगणे उचित होईल. जर दिल्लीतून हालचाली झाल्या तर, कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे पाकिस्तानी सैन्याला माहितीच आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला भारताची अजिबात चिंता नाही. भारताने संयम ठेवायला हवा. पाकिस्तानला युद्ध नको आहे. पण अशा पद्धतीने कारवाया करून दबाव टाकत असतील तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. आम्ही कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत, असेही ते म्हणाले. उरी हल्ल्यानंतर भारताकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने युद्धसज्ज राहण्याच्या दृष्टीने सर्व योजना तयार केलेल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताने बुधवारी चोख प्रत्युत्तर दिले होते. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या तीन सैनिकांचा खात्मा केला. मंगळवारी पाकिस्तानने भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या या दृष्कृत्याचा हिशेब भारताने दुसऱ्याच दिवशी चुकता केला होता. पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. यातील एका जवानाचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारतीय सैन्यात संतापाची लाट होती. माछिल सेक्टरमध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यानंतर भारतीय सैन्याने आक्रमकपणे पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. भारताच्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झालेत. याशिवाय पाकिस्तानी लष्करातील कॅप्टन दर्जाचा अधिकाऱ्याचादेखील भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात खात्मा झाला होता.