भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन सैनिक ठार झाल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या गोळीबारात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन सैनिकांचा समावेश आहे, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याच्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला असल्याचेही पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारताच्या जवानांना वीरमरण आले. यानंतर भारताकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता. बुधवारी सकाळपासूनच भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ‘भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानच्या तीन सैनिकांना जीव गमवावा लागला,’ अशी माहिती संध्याकाळनंतर पाकिस्तानकडून देण्यात आली. कॅप्टन तैमूर अली खान, हवालदार मुश्ताक हुसेन आणि लान्स नायक गुलाम हुसेन या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले.

भारतीय सैन्याने तीन सैनिक आणि एका कॅप्टनला टिपत अवघ्या चोवीस तासांमध्ये भारतीय जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला. यानंतर पाकिस्तानने भारताकडे डीजीएमओ (डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) स्तरावर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली आहे. भारताकडे डीजीएमओ स्तरावर चर्चा करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानने माध्यमांना दिली आहे.

‘भारतीय सैन्याच्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. नीलम खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याने प्रवासी बसवर गोळीबार केला,’ अशी माहिती पाकिस्तानकडून याआधी देण्यात आली होती. तर पाकिस्तानी माध्यमांनी भारतीय सैन्याच्या गोळीबारात १० नागरिक मारले गेल्याचे वृत्त दिले आहे. मात्र भारतीय जवानाच्या मृतदेहाचे विटंबन केल्याचा पाकिस्तानकडून इन्कार करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

‘जवानाच्या मृतदेहाचा विटंबनेचा भारताचा दावा चुकीचा आणि तथ्यहीन आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी दाखवलेले वृत्त चुकीचे आहे. पाकिस्तानची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांना ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘जवानाच्या मृतदेहाच्या विटंबनेसारख्या दुष्कृत्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नाही. पाकिस्तानी सैन्य कधीही अशा प्रकारची कृती करु शकत नाही. आम्ही कधीही अशा कृतीचे समर्थन करत नाही,’ असे झकेरिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर किंवा आंतरराष्ट्रीय सीमेवर कोणतीही आगळीक केल्यास पाकिस्तानकडून भारताला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही झकेरिया यांनी म्हटले आहे.