पाकिस्तानकडून यंदाच्या वर्षात सीमा रेषेवरील घुसखोरीचे प्रमाण वाढले असून १ ऑगस्टपर्यंत पाकिस्तानने तब्बल २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली.

शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सीमारेषेवरील सुरक्षेविषयी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली. जम्मू- काश्मीरमध्ये सीमारेषेवरील घुसखोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. पण जवानांनी हे प्रयत्न हाणून पाडल्याने पाकिस्तानच्या हद्दीत जीवितहानीचे प्रमाण वाढले असे जेटलींनी सांगितले. २०१७ मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघनही वाढले असून चालू वर्षात पाकने १ ऑगस्टपर्यंत २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत हेच प्रमाण २२८ ऐवढे होते अशी माहिती जेटलींनी दिली. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षी आठ जवान शहीद झाले होते असे त्यांनी सांगितले. पण या वर्षी आत्तापर्यंत किती जवान शहीद झाले याची माहिती त्यांनी दिली नाही.

भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचीदेखील त्यांनी माहिती दिली. गेल्या वर्षी २९ सप्टेंबररोजी भारतीय सैन्याने पाकच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते असे त्यांनी सांगितले. शस्त्रसंधीचे उल्लंघनाला भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप खासदार भैरव प्रसाद मिश्रा यांच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.