पाकिस्तानच्या लष्कराची दर्पोक्ती

दहशतवादी गटांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची दपरेक्ती पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षांनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्याबरोबरच कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही लगेचच यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला देणाऱ्या येणाऱ्या २५५ दशलक्ष अमेरिकी डॉलरची लष्करी मदतही रोखली आहे. पाकिस्तानच्या जनतेसाठी अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर देणार असल्याचे इंटर सव्‍‌र्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल असिफ गफर यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी १ जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्दय़ावर नेहमीच दगा दिल्याचे म्हटले होते. पाकिस्तानकडूनच दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली जाते आणि आश्रयही दिला जातो, असेही ट्रम्प ट्विटमध्ये म्हणाले होते. या ट्विटरनंतर पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, पाकिस्तानकडून दहशतवादाला थारा दिला जात नसल्याचा दावाही करण्यात आला.