मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका होणार आहे. हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ करावी, अशी पाक सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि सईदच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

जानेवारी २०१७ मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच दहशतवादाविरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. जमात- उद- दवाविरोधात कारवाई न झाल्यास निर्बंध लादले जातील, अशी तंबीच त्यांनी पाकिस्तानला दिली होती. या इशाऱ्यानंतर पाकच्या तपास यंत्रणांना खडबजून जाग आली आणि हाफिझ सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले. यानंतर सातत्याने हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्यात येत होती.

बुधवारी पाकिस्तानमधील न्यायालयात हाफिज सईदच्या नजरकैदेबाबत सुनावणी झाली. अन्य प्रकरणांमध्ये हाफिज सईद वाँटेड नसेल तर त्याची सुटका करावी, असे कोर्टाने सांगितले. कोर्टाने त्याच्या नजरकैदेत वाढ करण्यास नकार दिल्याने सईदची सुटका होणार आहे. गुरुवारी त्याची सुटका होण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधी कायदा १९९७ च्या अंतर्गत हाफिज सईदला ३० जानेवारीपासून लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गृह विभागाने त्याच्या नजरकैदेत ३० दिवसांची (२६ नोव्हेंबरपर्यंत) वाढ केली होती.