पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा दुरूपयोग करत आहे. काश्मीरमधील मानवाधिकाराची गोष्ट करणाऱ्या पाकिस्तानने स्वत:च्या घरात वाकून बघावे. जो देश स्वत:चे सोडून नेहमीच दुसऱ्या देशांकडे बघत असतो, त्याने इतरांना मानवाधिकार शिकवू नये, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी गुरूवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. संयुक्त राष्ट्रसंघात सर्वसाधारण सभागृहाच्या अध्यक्षांकडून आयोजित करण्यात आलेल्या मानवाधिकार विषयासंबधीच्या चर्चेत अकबरूद्दीने यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा दुरूपयोग करत असल्याचे म्हटले. पाकिस्तान हा देश दुसऱ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करणारा आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे. पाकिस्तानकडून नेहमीच दहशतवादी विचारांचे समर्थन करण्यात आले असून संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या अनेक दहशतवाद्यांनाही पाकिस्तानने आश्रय दिला आहे. मानवी अधिकारासंबंधी पाकिस्तानची भूमिका ही पूर्णपणे ढोंगीपणाची असल्याची खरमरीत टीका अकबरुद्दीन यांनी केली.
यावेळी चर्चेच्या सुरूवातीला पाकिस्तानकडून काश्मीरमधील दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बुरहान वानी हा काश्मिरींचा नेता होता. भारतीय लष्कराने ठरवून त्याची हत्या केल्याचा आरोप पाकचे युनोतील प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी केला. त्यावेळी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकच्या या मुद्द्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारताविरोधी दहशतवाद्यांना हुतात्मा ठरवून तुम्हाला युनोच्या मानवी हक्क समितीचे सदस्यत्व मिळणार नाही. मानवतेबद्दल बोलण्याआधी तुमचा इतिहास तपासा, अशा कडक शब्दांत अकबरुद्दीन यांनी पाकची खरडपट्टी काढली. भारतीय लष्करासोबतच्या चकमकीत बुरहान वानी मारला गेल्यानंतर बुधवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी शोक व्यक्त केला होता.