पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखावर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आणि नेत्यांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मोदींची भाषा चिथावणीखोर असून त्यातून नवा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाला उत्तर म्हणून भारताने बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अत्याचार जगासमोर मांडून तेथील स्वातंत्र्य चळवळींना मदत करण्याची भूमिका मोदींनी व्यक्त केली होती. त्यावर पाकिस्तानी ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, मोदींची भाषा आक्रमक आणि राजनैतिक संकेतांचा भंग करणारी होती. भारतीय पंतप्रधानांच्या पाकिस्तानमध्ये वक्तव्याकडे एक धमकी म्हणून पाहिले जाईल. पाकिस्तानही त्याला उत्तर म्हणून भारताच्या ईशान्येकडील राज्यांतील अस्थिरतेवर बोट ठेवू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री नवाब सनाउल्ला झहरी यांनीही मोदींच्या वक्तव्यावर राग व्यक्त केला आहे. पाकिस्तानी सरकार आणि बलुचिस्तानची जनता मोदींचे विचार धुडकावून लावतात. बलुचिस्तानचे नागरिक देशप्रेमी आणि एकनिष्ठ आहेत आणि ते बाह्य़ शक्तींच्या कारस्थानांना बळी पडणार नाहीत.