मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रेहमान लख्वी याच्या अटकेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला पाकिस्तान सरकारने तेथील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
झकीउर रेहमान लख्वी याला पुन्हा ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने निलंबित केला. २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी त्याला याआधीच जामीन मंजूर केला होता, पण भारताने संसदेत त्या निर्णयाचा निषेध केल्यानंतर त्याला पुन्हा तीन महिने कोठडीत टाकण्यात येईल, असे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा तुरुंगात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
दरम्यान, लख्वी याला सध्या अपहरणाच्या खटल्यात पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे तो अद्याप तुरुंगातच आहे. मात्र, अपहरणाच्या आरोपावरून केलेल्या अटकेला लख्वी याने न्यायालयात आव्हान दिले आहे.