थेट युद्ध झेपत नसल्याने पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. एकमेकांना दोष देण्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न सामोपचाराने सोडवण्यावर भर द्यावा, असा उपरोधिक सल्ला पाकिस्तानने दिला असून मोदी यांचे आरोप हे निराधार असल्याचा दावा केला.
भारताच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वाकडून पाकिस्तानवर करण्यात आलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आहेत. पाकिस्तान भारताशी संबंध सुधारू पाहत असताना हे आरोप करण्यात आले आहेत. मे महिन्यात भारतीय पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहताना पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी द्विपक्षीय संबंध सुरळीत व्हावेत, अशीच इच्छा व्यक्त केली होती, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाच्या सर्वच प्रकारांचा निषेध केला आहे. याच दहशतवादामुळे पाकिस्तानला आपल्या ५५ हजार निरपराध नागरिकांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दहशतवादाची सर्वात जास्त झळ आम्हालाच बसली आहे, असे अस्लम म्हणाल्या. मात्र त्याच वेळी आमची सैन्य दले सीमांचे रक्षण करण्यास समर्थ असून कुठल्याही आक्रमणाला ते चोख प्रत्युत्तर देतील, असे बोलही त्यांनी सुनावले.
प्रादेशिक शांततेच्या दृष्टीने एकमेकांवर दोषारोप करणे कुणाच्याही हिताचे नाही.
मतभिन्नतेचे मुद्दे चर्चेच्या व संवादाच्या माध्यमातून सोडवले जावेत आणि उभय देशांमधील संबंध मैत्रीचे व सहकार्याचे असावेत, अशी अपेक्षा अस्लम यांनी व्यक्त केली.

केवळ वल्गना नकोत- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
नुसत्या वल्गनांपेक्षा पाकिस्ताने दहशतवादविरोधी कारवाया हाती घेतल्या तर आमची चिंता दूर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या आड येणाऱ्या दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात भारत सर्वशक्तीनिशी दहशतवादाला मूठमाती देण्यास तयार आहे. त्याविरोधात कोणती कारवाई करायची याबाबत आम्हाला कोणी बंधने आणू शकत नाही, असे प्रत्युत्तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आले. पाकिस्तानने पंतप्रधान मोदी यांना बुधवारी टोमणा मारल्यानंतर मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त केली.