पाकिस्तानमधील कराचीमध्ये सोमवारी एक स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाकिस्तान अर्धसैनिक दलातील एका जनावाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झालेत. पाकिस्तानमध्ये निर्बंध घालण्यात आलेल्या बलूच लिब्रेशन आर्मी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कराचीमधील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या ओरंगी परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकलवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. हा स्फोट झाला तेव्हा पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांची एक गाडी या ठिकाणावरुन जात होती. या स्फोटाचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

कराचीमधील या स्फोटामध्ये पाकिस्तान रेंजर्सचे तीन सैनिक जखमी झालेत. तर इतर तीन जणही गंभीर जखमी झाले असून चार जणांना किरकोळ जखमा झाल्यात. सर्व जखमीना कराचीमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशाप्रकारे कराचीमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्येही स्फोट झाला होता.

हा स्फोट ज्या भागात झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्हीमध्ये पाकिस्तानी रेंजर्सची गाडी गर्दीच्या ठिकाणावरुन जाताना दिसत आहे. ही गाडी गर्दीमधून वाट काढत असतानाच रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका बाईकचा स्फोट होतो. या स्फोटाच्या पाच मिनिटांआधीच ही गाडी एक व्यक्ती या ठिकाणी उभी करुन गेल्याची माहिती समोर येत आहे. या गाडीवर पाच ते सहा किलो स्फोटके ठेवण्यात आलेली.

या घटनेचा सध्या पोलीस तपास करत आहेत. तसेच इतर सुरक्षा यंत्रणांनाचाही गरज पडल्यास या घटनेच्या तपासामध्ये समावेश करुन घेण्यात येईल. बलूच लिब्रेशन आर्मी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून मागील वर्षीही अशाप्रकारे पाकिस्तानी रेंजर्सच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आलेले.