पाकिस्तानने भारताला सर्वाधिक पसंतीचा देश (एमएफएन) असा दर्जा देण्यावरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार सुरळीतपणे सुरू होण्याची प्रक्रिया अवलंबून आहे, असे सरकारच्या वतीने शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट करण्यात आले.
तथापि, पाकिस्तानने भारताला अद्याप सर्वाधिक पसंतीचा दर्जा दिलेला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. भारताने १९९६ मध्येच पाकिस्तानला सर्वाधिक पसंतीचा देश दर्जा दिला आहे.
पाकिस्तानने भारताला दर्जा दिल्यास थेट परस्पर व्यापार सुरू होईल आणि त्याचा दोन्ही देशांना आर्थिक लाभ होईल. काही तरी योग्य घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सीतारामन यांनी, दोन्ही देशांमध्ये व्यापाराबाबत बोलणी झाली नसल्याचे सांगितले.
दोन्ही देशांच्या वाणिज्य सचिवांच्या बैठकीत जो पथदर्शक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे त्यानुसार व्यापार सुरळीत सुरू करणे शक्य असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीच्या वेळी व्यक्त करण्यात आले होते.