पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी बुशरा बीबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बुशरा बीबी यांच्यासंदर्भात पाकिस्तानच्या पीएमओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. “बुशरा बीबी या आरशातही दिसत नाही,” असा दावा कर्मचाऱ्यांनी केला असून, एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी आणि पाकिस्तान प्रथम महिला बुशरा बीबी यांच्या विषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. बुशरा बीबी या आस्तिक असून, पंतप्रधान खान यांच्या पत्नीपैकी बुरखा परिधान करणाऱ्या त्या पहिल्याच आहेत. दरम्यान, पाकिस्तानातील एका वृत्त वाहिनीने पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने इमरान खान यांची पत्नी बुशरा बीबी या आरशात दिसत नाही असा दावा केला होता, असे वृत्त एएनआयने दिले आहे. या वृत्तावरून ट्विटरवरील नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

इमरान खान आणि बुशरा बीबी यांचा विवाह झाला आहे. पंतप्रधान होण्याच्या सहा महिने आधी दोघांचा विवाह झाला होता. दरम्यान संयुक्त राष्ट्र महासंघाच्या ७४ व्या महासभेत इमरान खान सहभागी झाले होते. या सभेसाठी न्यूयॉर्कला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सौदी अरेबियात धार्मिक विधी केला होता. यावेळी बुशरा यांनी बुरखा परिधान केला होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली.