क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी ‘सीआयए’ला मदत केल्याप्रकरणी शकील आफ्रिदी या डॉक्टरची सुटका करण्याची शक्यता पाकिस्तानने फेटाळली आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याची सुटका करण्याचा निर्णय न्यायालयच घेईल, असे मत पाकिस्तान सरकारने व्यक्त केले.
‘शकील आफ्रिदीची सुटका करावी, अशी सूचना जरी अमेरिकेकडून करण्यात आली असली, तरी त्याच्या सुटकेची शक्यता कमीच आहे. कारण त्याच्यावर विविध गुन्हे नोंदवण्यात आले असून, न्यायालयच त्याबाबत अंतिम निर्णय घेईल,’ असे पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते तस्निम अस्लाम यांनी सांगितले.
आफ्रिदीला ३३ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याची सुटका न केल्यास पाकिस्तानला मिळणारे तीन कोटी ३० लाख डॉलरचा मदतनिधी रोखून धरला जाईल, अशी धमकी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने दिली होती. मात्र या धमकीनंतरही आफ्रिदीची सुटका करता येणार नाही, असे परराष्ट्र व्यवहार विभागाने म्हटले आहे. सध्या पेशावरच्या कारागृहात असलेल्या आफ्रिदीला मे २०११ मध्ये अटक करण्यात आली होती.