पत्रकारांना नियंत्रण रेषेवर घेऊन जायचे असल्याने पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंन न करण्याची भारताला विनंती केली होती. भारताने सुद्धा पाकिस्तानच्या या विनंतीचा मान राखत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही. पण पाकिस्तानी लष्कराने पुन्हा गोळीबार सुरु केला आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेजवळ शाळेत गेलेली मुले अडकून पडली.

दोन दिवसांपूर्वी रविवारी भारतीय लष्कराने तोफगोळयांच्या स्ट्राइक करुन पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे चार तळ उडवून दिले. यामध्ये पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यांचे अनेक दहशतवादी आणि सैनिक मारले गेले. पण त्यानंतरही पाकिस्तान वठणीवर आलेला नाही.

पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात मोठे जन आंदोलन झाले. स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्या नागरीकांची सुरक्षापथकांबरोबर चकमक झाली. पाकिस्तानी लष्कर राजनैतिक अधिकारी आणि पत्रकारांना नियंत्रण रेषेवर घेऊन गेले होते. त्यादिवशी हे सर्व घडले.

पूँछ जिल्ह्यातील मेंढार आणि बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरीक जखमी झाले आहेत. तंगधार आणि केरान सेक्टरमधील चार लाँचपॅड भारतीय लष्कराने रविवारी नष्ट केले. ६ ते ७ दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिकांचा या कारवाईत मृत्यू झाला. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला उत्तर म्हणून भारताने थेट तोफगोळयांचा मारा केला.

पाकिस्तानला कठोर इशारा देण्याचा हेतू त्यामागे होता. पण पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानने त्यांचे नुकसान झाल्याचे मान्य केलेले नाही. पाकिस्तान इस्लामाबादमधील विविध देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारताच्या कारवाईत नागरी वस्त्यांचे किती नुकसान झाले ते दाखवण्यासाठी नियंत्रण रेषेवर घेऊन गेला होता. नीलम व्हॅलीमध्ये या पथकाला नेण्यात आले होते.