राफेल फायटर विमानाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने JF-17 या फायटर विमानामध्ये सुधारणा केली आहे. राफेल हे आजच्या घडीचे जगातील अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर जेट विकत घेण्याचा करार केला आहे. त्यातील तीन विमाने भारताकडे सुपूर्द करण्यात आली असून यावर्षी ती इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होतील.
काय आहे JF-17 ?
JF-17 हे चीन आणि पाकिस्तानने मिळून संयुक्तपणे विकसित केलेले फायटर विमान आहे. JF-17 च्या नव्या आवृत्तीचा लवकरच पाकिस्तानी हवाई दलात समावेश होणार आहे. या विमानाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात विमानाच्या नव्या आवृत्तीने पहिले उड्डाण केले.
दक्षिणपश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडुमध्ये JF-17 ब्लॉक ३ विमानाची उड्डाण चाचणी घेण्यात आल्याची माहिती एअरोस्पेसशी संबंधित असलेल्या मॅगझिनने दिली.
बालाकोट एअर स्ट्राइकनंतर JF-17 वापरले होते?
सध्या JF-17 फायटर विमाने पाकिस्तानी हवाई दलाकडे आहेत. मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्यादिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. त्यामध्ये JF-17 विमाने सुद्धा होती. JF-17 ही सिंगल इंजिन विमाने पाकिस्तानच्या पीएसी आणि चीनच्या सीएसीने मिळून विकसित केली आहेत.
विमानाच्या दिशेने येणाऱ्या मिसाइलची माहिती मिळणार?
चीनकडे असलेल्या अत्याधुनिक J-20 फायटर विमानांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञान JF-17 च्या नव्या आवृत्तीमध्ये वापरण्यात आले आहे. JF-17 ची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी नव्या आवृत्तीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. J-10C, J-16 आणि J-20 प्रमाणे JF-17 मध्ये विमानाच्या दिशेने येणाऱ्या मिसाइलची माहिती देणारी इन्र्फारेड सिस्टिम बसवण्यात आली आहे. यावर्षी २०२० मध्ये JF-17 च्या नव्या आवृत्तीचा पाकिस्तानी हवाई दलात समावेश करण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2020 8:06 pm