जॅनेस डिफेन्स विकलीची माहिती

अमेरिकेने आठ एफ १६ विमाने देण्याचे जाहीर केले असतानाच पाकिस्तानने आणखी विमानांची मागणी केली असून भारताच्या संरक्षण खर्चाच्या तोडीस तोड खर्च करून जुन्या विमानांच्या जागी नवी विमाने तैनात करण्यासाठी रशिया व फ्रान्स या देशांकडे लढाऊ विमाने देण्याची विनंती केली आहे.

जॅनेस डिफेन्स विकलीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने आणखी दहा एफ १६ विमाने मागितली असून सध्या ओबामा प्रशासनाने त्यांना आठ विमाने देण्याचे कबूल केले आहे व तशी मान्यता सिनेटनेही दिली आहे.

पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे की, जॅनेस डिफेन्स विकलीच्या मते पाकिस्तानने १६ सी/डी ब्लॉक ५२ प्रकारची आणखी बहुउद्देशी लढाऊ विमाने मागितली आहेत ती अचूक लक्ष्य साधणारी असून त्यांची क्षमताही अधिक आहे. दहशतवादा विरोधातील लढाईत पाकिस्तानचे होणारे नुकसानही त्यामुळे टळणार आहे. पाकिस्तानी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आणखी १० एफ १६ विमाने मागवण्याचे ठरवले असून त्याला तत्त्वता मान्यता दिली आहे.

पाकिस्तानी हवाई दलातील १९० विमाने २०२० पर्यंत कामकाजातून बाद होणार आहेत त्यामुळे पाकिस्तान नवीन लढाऊ विमानांच्या शोधात आहे. अमेरिकी काँग्रेसमध्ये पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्यास मोठा विरोध झाला होता. त्यावेळी पाकिस्तानला आठ एफ १६ विमाने देण्याचा निर्णय ओबामा प्रशासनाने घेतला व अखेर तो संमतही झाला.

त्यामुळे आता पाकिस्तानच्या आशा उंचावल्या असून रशिया व फ्रान्सकडूनही विमाने घेण्याची शक्यता तपासली जात आहे. फ्रान्सची विमाने महागडी असून रशियाची महाग नाहीत व चांगली आहेत. भारत जुनी विमाने बदलत असून त्यांना तोडीस तोड विमाने पाकिस्तानकडे २०२० पर्यंत असली पाहिजेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तान भारताशी संख्यात्मक बरोबरी करणार नाही तरी ३५० ते ४०० उत्तम लढाऊ विमाने पाकिस्तानकडे असणे आवश्यक आहे. चीनशी पाकिस्तानचे चांगले संरक्षण सहकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.