पाकिस्तानकडून अजूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. रविवारी काश्मीरमधील पुंछ परिसरातील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये आतापर्यंत ५ जण ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा दलांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जम्मूचे पोलीस महासंचालक एस डी जामवान म्हणाले की, देवता गावातील ५ लोक ठार झाले असून दोघे जखमी आहेत. सध्या आम्ही परिस्थितीची समीक्षा करत आहोत. आमचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. जखमींवर चांगल्या ठिकाणी उपचार व्हावेत म्हणून हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहे. अजूनही गोळीबार सुरू आहे. मोहम्मद रमजान त्याची पत्नी आणि तीन मुलांचा मृतांत समावेश असून आणखी दोन मुले जखमी आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

यावर्षाच्या सुरूवातीपासूनच पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. गृह मंत्रालयाने लेखी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१८ पर्यंत एकूण ४३२ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. पोलीस महानिरीक्षक एस पी वैद्य घटनेची माहिती देताना म्हणाले की, आतापर्यंत या हल्ल्यात ५ जण ठार झाले असून दोघे जखमी असल्याचे वृत्त आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शनिवारीही जम्मू-काश्मीरमधील हाजिपोरा येथे एसएसपी शोपियांच्या वाहनावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दि. १५ मार्च रोजीही दहशतवाद्यांनी भाजपा नेते अन्वर खान यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात खान थोडक्यात बचावले होते.