इस्लामाबाद : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला लागोपाठ दुसऱ्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमात संमिश्र स्वागत झाले आहे.मोदी यांच्या जोरदार विजयाने उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरकारे येण्याचा जगातील कल भारतातही कायम राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील प्रसारमाध्यमात मोदी विरोध तात्पुरता कमी झालेला दिसून आला कारण या निवडणुकीतील मोदींचे यश अनपेक्षित नव्हते. मोदींमुळे मुस्लिमांना व अल्पसंख्याकांना धोका असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले नसले, तरी विश्लेषण व संपादकीयात मात्र मुस्लिमांना धोका असल्याचा मुद्दा आला आहे. निवडणुकीचे सखोल वार्ताकन व सखोल विश्लेषण यांचा समावेश वार्ताकनात झालेला नाही. बहुतांश सर्व वृत्तपत्रे व इतर माध्यमांनी वृत्तसंस्थांच्या आधारे वार्ताकन केले आहे.

पाकिस्तानचे कुठलेच वार्ताहर निवडणुकीच्या वार्ताकनासाठी भारतात आलेले नव्हते.  ‘डॉन’ या वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर बातमी दिली आहे, त्यात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा तयार करून मोदी यांनी जोरदार विजय मिळवला असे म्हटले आहे. बालाकोट येथील हल्ल्यांचे शिल्पकार म्हणून मोदी यांनी आधीच खंडित असलेल्या विरोधकांना जायबंदी केले. आता पुढील सरकार भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचे भवितव्य ठरवणार आहे. प्रचाराच्या वेळी मोदी यांनी जैशने पुलवामात केलेला हल्ला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये बालाकोट येथे भारताने केलेले हल्ले हे मुद्दे उपस्थित करीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. मोदी यांचा विजय हा जातीयवादी राजकारणाचा विजय आहे, अशी टीका डॉनने केली असून भारतीय प्रजासत्ताकाचे भवितव्य ठरवण्याच्या काळात जातीय राजकारणाचा विजय झाला असून या निकालातून धार्मिक विद्वेष व मतांसाठी फुटीरतेचे राजकारण एवढेच दिसून येते. मोदी यांनी प्रचारात मुस्लीम विरोधी व पाकिस्तान विरोधी विधाने केली. पाकिस्तानात हवाई हल्ले करून राष्ट्रवादी भावना त्यांनी चेतवल्या, असे डॉनचे म्हणणे आहे.

दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने त्यांच्या मुख्य बातमीत म्हटले आहे, की भारतातील निवडणुकात मोदी जिंकणार हे अपेक्षित होते.

‘जागतिक कलांशी मिळताजुळता विजय’

दी न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे, की मोदींचा विजय नाटय़मय असला तरी जागतिक कलांशी मिळताजुळता आहे. उजव्या विचारांच्या पक्षांचा अमेरिकेपासून ब्राझील, इटलीपर्यंत विजय झालेला असताना भारतही त्याला अपवाद नाही. या सर्वच देशांनी व्यापारात संकुचितता, स्थलांतर, संरक्षण हे मुद्दे पुढे आणले आहेत.  दी न्यूज इंटरनॅशनलमधील लेखात एयाझ झाका सय्यद यांनी म्हटले आहे,की या निवडणुकीत मोदी व भाजप जिंकणारच होते व त्या विजयास ते पात्र होते कारण त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांना विजयाची भूक होती. मोदी हे अनेक पापांत भागीदार आहेत, पण विरोधकांना त्यांचे अपयश दाखवता आले नाही. भाजपच्या द्वेषमूलक व विषारी प्रचाराला ते सकारात्मक उत्तर देऊ शकले नाहीत. नरेंद्र मोदी यांना पदावरून खाली खेचणे याशिवाय विरोधकांचा दुसरा कुठलाच कार्यक्रम नव्हता. काँग्रेसने न्यायचे दिलेले आश्वासन हे निवडणुकीत फार नंतर आले. ते भाजपच्या कंठाळी प्रचारात वाहून गेले.