गंभीर आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मित्र देश मलेशियानेच झटका दिला आहे. मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७७७ प्रवासी विमान जप्त केले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हे विमान भाडयावर घेण्यात आले होते.
पैसे वेळेवर न चुकवल्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. क्वालालंपूर विमानतळावर जप्तीची ही कारवाई झाली. त्यावेळी विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. त्या सर्वांना अत्यंत मानहानीकारक पद्धतीने विमानातून खाली उतरवण्यात आले. विमान जप्तीची कारवाई झाली असली, तरी या प्रकरणात ब्रिटनच्या न्यायालयात खटला सुरु आहे.
पाकिस्तानी वर्तमानपत्र डेली टाइम्सच्या वृत्तानुसार,पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाइन्सच्या ताफ्यात एकूण १२ बोईंग ७७७ विमाने आहेत. या विमानांना वेगवेगळया कंपन्यांकडून वेळोवेळी भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. मलेशियाने जप्त केलेले विमान भाडेतत्वावर होते. करारानुसार भाडे न भरल्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्याआधी सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानला दिलेले ३ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करायला सांगितली. इम्रान खान सरकारने चीनकडून कर्ज घेऊन सौदीचे कर्ज फेडले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 6:15 pm