भारत आणि पॅलेस्टाइनमध्ये परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते ‘ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ या सन्मानाने शनिवारी गौरविण्यात आले. पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारांच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषवणाऱ्या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदींना या सन्मानाने गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत ज्यांनी पॅलेस्टाइनला अधिकृत भेट दिली आहे.

यापूर्वी पॅलेस्टाइनकडून सौदी अरेबियाचे राजे सलमान, बहारिनचे राजे हमद, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांसारख्या राष्ट्रप्रमुखांना ‘गॅँड कॉलर’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान UAE ला जातील आणि मंदिराची पायाभरणीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यासोबत चर्चाही करतील. दरम्यान, मोदींनी पॅलेस्टाइनचे दिवंगत राष्ट्रपती यसीर अराफात यांच्या कबरवर पुष्पांजली वाहिली.

पॅलेस्टाइनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदींची ही चौथी भेट आहे. यापूर्वी या दोन्ही नेत्यांची भेट यूएनच्या जनरल असेंब्लीत २०१५ मध्ये, पॅरिस क्लायमेट समिट २०१६ मध्ये तर पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांच्या भेटी झाल्या आहेत. भारत मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावू शकतो, असे पॅलेस्टाइनने मानले आहे. पॅलेस्टाइनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE च्या दौऱ्यावर जातील.