देश व परदेशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची बनावट खाती व कंपन्या उघड करणारी पनामा कागदपत्रे ऑनलाईन टाकण्यात आली आहेत. कन्सोर्टयिम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट या संस्थेने एका जर्मन वृत्तपत्राला ही माहिती मिळाल्यानंतर त्या कागदपत्राचे विश्लेषण केले होते. ऑनलाईन टाकण्यात आलेल्या पनामा कागदपत्रात भारतातील एकूण २००० व्यक्ती, संस्था असून त्यात २२ परदेशी कंपन्या, १०४६ अधिकारी किंवा व्यक्ती, ४२ मध्यस्थ व इतर ८२८ पत्ते अशी माहिती आहे. यात भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई तसेच हरयाणातील सिरसा, बिहारमधील मुझफ्फरपूर, मध्यप्रदेशातील मंदसौर व भोपाळ तसेच ईशान्येकडील काही भागांचा उल्लेख आहे. भारताशी निगडित एकूण ३० हजार कागदपत्रे ऑनलाईन टाकण्यात आली आहेत. जगातील २१ न्यायक्षेत्रातील एकूण २१४००० बेनामी कंपन्यांचा पर्दाफाश नवीन कागदपत्रात झाला असून त्यात नेवाडा, हाँगकाँग व ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्सचा समावेश आहे.

आधी जारी करण्यात आलेल्या पनामा पेपर्समध्ये किमान ५०० भारतीय लोकांची नावे आहेत. डाटाबेसमध्ये  ११.५ दशलक्ष कागदपत्रे टाकण्यात आली असून त्यात मोझ्ॉक फोन्सेका कंपनीने सेवा दिलेल्या ३ लाख ६० हजार व्यक्ती किंवा कंपन्याची नावे आहेत. परदेशात अनेक बेनामी कंपन्या उघडण्यास मोझ्ॉक फोन्सेका ही विधी सल्लागार कंपनी मदत करीत होती, असे आयसीआयजे या पत्रकारांच्या संस्थेने म्हटले आहे. ही कागदपत्रे ऑनलाईन टाकल्याने आता जगातील श्रीमंत पण बनवेगिरी करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याची माहिती जगापुढे आली आहे. मोझ्ॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीने या लोकांना परदेशात बेनामी कंपन्या व बँक खाती काढण्यास मदत केली होती. या कागदपत्रांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून व इतरांचा समावेश आहे.

आइसलँडचे पंतप्रधान सिगमुंदूर डेव्हीड गुनालॉगसन व स्पेनचे उद्योगमंत्री जोस मॅन्युअल सोरिया यांनी बेनामी कंपन्यांच्या प्रकरणात राजीनामा दिला आहे. जॉन डो या गुप्त स्त्रोताला मिळालेल्या सगळ्या कागदपत्रांचा ताबा आयसीआयजेच्या पत्रकारांना मिळालेला नाही. करचुकवेगिरीच्या विरोधातील मोहीम म्हणून आम्ही या कागदपत्रातील आणखी काही भाग प्रसिद्ध करीत आहोत, असे आयसीआयजे या संस्थेने म्हटले आहे. बेनामी कंपन्यांचे लाभधारक कोण हे शोधण्याचे कामही चालू आहे. आता ही कागदपत्रे ऑनलाईन टाकण्यात आल्याने लोकही या कंपन्या व त्याच्याशी संबंधित व्यक्ती यांचे संबंध बघू शकतात. तरीही कच्ची माहिती जशीच्या तशी ऑनलाईन टाकलेली नसून बँक खात्यांचा तपशील व व्यक्तिगत माहिती गाळण्यात आली आहे. केवळ नावे व ओळख देण्यात आली आहे. मोझ्ॉक फोन्सेकाने सेवा दिलेल्या व्यक्ती व कंपन्या चीन, मध्यपूर्व तसेच लॅटिन अमेरिका व युरोपातील आहेत. मोझ्ॉक फोन्सेकाच्या चाळीस वर्षांच्या जुन्या डिजिटल माहिती संग्रहातून ही माहिती मिळवण्यात आली आहे.