News Flash

२० दिवसात १८ प्राध्यापकांचा करोनामुळे मृत्यू; अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचं ICMR ला पत्र

आजी-माजी ४० प्राध्यापकांचा झाला मृत्यू

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य रॉयटर्स)

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये मागील २० दिवसांमध्ये १८ प्राध्यापकांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालाय. अल्पावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झल्याने विद्यापीठात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे. विद्यापीठ प्रशासनाने आता येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये विद्यापिठातील वैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉक्टर साबा खान (५८), कायदा अभ्यास विभागाचे प्रमुख शकील अहमद समदानी (वय ५९), संस्कृत तज्ज्ञ आणि विद्यापिठामधून ऋगवेद या विषयामध्ये सर्वात आधी पीएचडी पदवी मिळवणारे ६० वर्षीय खलीद बीन युसूफ यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

“आम्ही मागील काही दिवसांमध्ये आमच्या विद्यापीठातील वरिष्ठ सदस्य करोनामुळे गमावले आहेत. येथील परिस्थिती फार चिंताजनक आहे,” असं द प्रिंटशी विद्यापिठाच्या प्रमुख प्रवक्ता असणाऱ्या शाफी किडवाई यांनी सांगितलं. “मागील २० दिवसांमध्ये आमच्या येथील १८ शिक्षकांचा मृत्यू झाला असून यामुळे चिंता वाढलीय,” असं किडवाई म्हणाले. विद्यापिठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये करोनाचे १०० हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. विद्यापीठातील विषाणू हा वेगळ्या प्रकारचा असल्याने इतरांनाही करोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही मागील आठवड्यामध्ये करोनामुळे मृत्यू झालाय. तारीक यांनी इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील करोनाबाधित व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या करोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विषाणूच्या नव्या प्रकारासंदर्भात जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केलीय. हे निकाल समोर आल्यानंतर येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील भीती कमी होण्यास मदत होईल असं मत व्यक्त केल जात आहे.

“अचानक मोठ्या संख्येने करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने विषाणूचा एखादा वेगळाप्रकार अलिगढमधील सिव्हिल लाइन्स आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वेगाने पसरत असल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळेच संबंधित विभागाला या भागातील करोना रुग्णांच्या चाचण्या करुन येथील करोनाबाधितांना झालेला संसर्ग हा वेगळ्या प्रकारच्या विषाणूमुळे झाला आहे का याची तपासणी करावी, अशी मी विनंती करतो. तुम्ही तपासणी करुन माहिती दिल्यास त्याप्रमाणे आम्ही संसर्ग नियंत्रणासाठी वेगळ्या उपाययोजना करु,” असं तारीक यांनी आयसीएमआरला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

विद्यापीठाच्या काही माजी प्राध्यापकांचाही मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या कार्यरत असणारे आणि निवृत्त झालेले असे एकूण ४० हून अधिक प्राध्यापक करोनाच्या साथीमुळे मरण पावल्याचं द प्रिंटच्या वृत्तात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:25 pm

Web Title: panic in amu as 18 professors die of covid in 20 days vc wants campus samples probed scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला; कोण होणार अध्यक्ष?
2 दिल्लीतील रुग्णालयात करोनाचा विस्फोट; ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह
3 हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ