करोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकऱणी जन अधिकार पक्षाचे नेते आणि माजी खासदार पप्पू यादव यांना आज अटक कऱण्यात आली. जीव वाचवणं हा जर गुन्हा असेल तर मी गुन्हेगारच आहे असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.

करोनाकाळात बाहेर फिरण्यासाठी परवानगी नसतानाही बाहेर फिरल्यामुळे पप्पू यादव यांना आज सकाळी पटनामधल्या त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. यावेळी यादव यांनी सांगितलं की ते करोनाबाधितांची मदत करत होते. या अटकेबद्दल प्रतिक्रिया देताना यादव यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणतात, करोनाच्या या काळात स्वतःचा जीव मुठीत धरुन इतरांचा जीव वाचवणं हा जर गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना उद्देशून ते पुढे म्हणतात, मला फाशी द्या, मला कैद करा पण मी लोकांना वाचवणारच आणि अप्रामाणिक लोकांना उघडं पाडणारच!
यादव यांनी असंही म्हटलं आहे की त्यांना झालेली अटक ही राजकीय कारणामुळे झाली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या नावाखाली ती लपवली जात आहे. यादव असंही म्हणाले की करोनाच्या या संकटामुळे आता लोकांना जाग आलेली आहे आणि भाजपा सरकारने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. त्यामुळे हे संकट मोदी आणि नितीश यांना चांगलंच महागात पडणार असल्याचंही त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बिहारमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे.