सीरियात हवाई हल्ले; पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधाराची ओळख, युरोपभर धाडसत्रे
पॅरिसमध्ये इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या भीषण हल्ल्यांच्या विरोधात आक्रमक बनलेल्या फ्रान्सने सोमवारी कठोर कारवाईस सुरुवात केली. फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी सीरियात आयसिसच्या छावण्यांवर पुन्हा एकदा जोमाने हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार शोधण्यात यश आले असून तो बेल्जियमचा नागरिक आहे. अब्देलहमीद अबौद असे त्याचे नाव असून, सध्या तो सीरियात लपल्याचा संशय आहे. पॅरिस आणि बेल्जियममध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर धाडसत्रे सुरू असून, एकटय़ा पॅरिस शहरात १७० ठिकाणी धाडी टाकून संशयितांना पकडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या धाडींमध्ये शस्त्रसाठा तसेच स्फोटकेही सापडली आहेत.
सोमवारी फ्रान्सच्या १० लढाऊ विमानांनी अमेरिकी सुरक्षा दलांबरोबर समन्वय साधून आयसिसचे मुख्य ठाणे असलेल्या राक्का शहरावर बॉम्बफेक केली. संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनमधील तळांवरून या विमानांनी आकाशात झेप घेतली. हवाई हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने आयसिसचे नियंत्रण केंद्र, दहशतवाद्यांचे भरती केंद्र, दारूगोळा साठा आणि प्रशिक्षण केंद्राचा समावेश होता. आयसिसच्या दोन तळांवर ही केंद्रे वसली होती आणि हल्ल्यांत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती फ्रान्सच्या सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वीच करण्यात आलेल्या हवाई टेहळणीतून ही लक्ष्ये निवडली होती. आयसिसने मात्र हे तळ आपण आधीच सोडून दिले होते आणि हल्ल्यांमध्ये फारसे काही नुकसान झाले नाही असा दावा केला आहे.
आयसिसची नवी धमकी
आयसिसने सोमवारी नवी चित्रफीत जारी केली . पॅरिसप्रमाणेच आणखी हल्ल्यांची धमकी त्यातून देण्यात आली. अमेरिकेत वॉशिंग्टनवरही हल्ला करण्याची योजना यात मांडली आहे.

सूत्रधाराची ओळख बेल्जियममध्ये जी चौकशी सुरू आहे त्यातील माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सीरियात असलेला अब्देलहमीद अबौद या कटाचा सूत्रधार असून तो सीरियात आहे, त्यानेच युरोपात असे अनेक हल्ले करण्याचा कट आखला आहे.
अब्देलहमीद अबौद मृतांनी भरलेली कार चालवताना त्याची एक चित्रफीत प्रसिद्ध झाली होती. त्यातून त्याची जगाला प्रथम ओळख झाली. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते त्याचा ऑगस्टमध्ये पॅरिसला जाणाऱ्या रेल्वेवर हल्ला करण्यात आणि एप्रिलमध्ये पॅरिसमधील एका चर्चवरील हल्ल्यात सहभाग होता.

अब्देलहमीद अबौद  मृतांनी भरलेली कार चालवताना त्याची एक चित्रफीत प्रसिद्ध झाली होती. त्यातून त्याची जगाला प्रथम ओळख झाली.   फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते त्याचा ऑगस्टमध्ये पॅरिसला जाणाऱ्या रेल्वेवर हल्ला करण्यात आणि एप्रिलमध्ये पॅरिसमधील एका चर्चवरील हल्ल्यात सहभाग होता.