बिस्किटांचं उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी पारले प्रोडक्ट्समधील दहा हजार जणांवर नोकरी गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. उपभोक्त्यांकडून बिस्किटांची मागणी घटल्यामुळे पारले कंपनीतील 10 हजार जणांची नोकरी जाऊ शकते. त्यासाठी 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे.

“आम्ही 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. सामान्यतः पाच रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या पाकिटातून यांची विक्री होते. पण जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर आमच्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 हजार जणांना कामावरुन कमी करावं लागेल. विक्री घटल्याचा मोठा तोटा कंपनीला सहन करावा लागत आहे”, असं कंपनीचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी सांगितलं. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

“उपभोक्त्यांकडून बिस्किटांची मागणी घटल्यामुळे किरकोळ विक्रेतेही प्रोडक्ट्सची खरेदी करत नाहीयेत. अधिक जीएसटी आकारल्याने उपभोक्त्यांकडून मागणी घटली आहे. सरकार यावर काहीही पावलं उचलत नाहीये. त्यामुळे परिस्थिती अजूनच खराब झालीये. कमी किंमतीची बिस्किट कमी नफ्यासह विकली जातात. आमची अशी अनेक प्रकारची बिस्किटं आहेत जी मध्यम वर्गाला आणि आर्थिक उत्पन्न अत्यंत कमी असणाऱ्या वर्गाला लक्ष्य करुन उत्पादित केली जातात, मागणी पूर्ववत व्हावी यासाठी सरकार कर कमी करेन असा विश्नास आहे”, असंही शाह म्हणालेत.