वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेल्या व्यक्तींवर एकामागून एक आरोप करणारे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यापासून पक्षाने दोन हात लांबच राहण्याचे ठरवलेले दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी विविध आरोप लावल्यानंतर भाजपने लगेचच ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.


अरविंद सुब्रमण्यम यांची त्या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. ट्विटरच्या माध्यमातून बुधवारी सकाळी त्यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्या अनेक निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये बौद्धिक स्वामित्व हक्कावरून स्वामींनी सुब्रमण्यम यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर वस्तू व सेवा विधेयकामध्ये काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यम यांचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपने या प्रकरणातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात. सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात. त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे स्वामी यांनी म्हटले आहे. या व्यक्तींना सरकारने फारसा विचार न करता संबंधित पदांवर बसवले होते, असे सांगत त्यांनी मोदी यांच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या व्यक्ती भाजपच्या निष्ठावान आहेत. त्यांना वरिष्ठ पदांवर संधी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.