इराणमधील बंदर ए माहशहर येथे सोमवारी १३५ प्रवासी असलेलं विमान उतरल्यानंतर धावपट्टीवरून ते थेट विमानतळालगतच्या एका वाहतुकीच्या मार्गावर जाऊन थांबले, सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तेथील सरकारी माध्यमांद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

माहशहर येथील विमानतळावर पोहचल्यानंतर वैमानिकाने हे विमान थोडे उशीरा धावपट्टीवर उतरवले परिणामी त्याने धावपट्टीची सीमा ओलांडली व ते थेट विमानतळालगतच्या वाहतूकीच्या मार्गावर जाऊन थांबले. या नाट्यमय व थरारक प्रकारामुळे विमानातील प्रवाशी प्रचंड घाबरले होते. मात्र, कोणताही अनर्थ घडला नाही, सुदैवाने विमानचालकासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

हे विमान जेव्हा वाहतूकीच्या मार्गावर आले तेव्हा दोन्ही बाजुनी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात देखील कैद्य केली. तर अनेकांनी व्हिडिओ बनवले. जेव्हा एकदाचे कसेबसे हे विमान थांबले तेव्हा प्रवाशांनी एकमेकांना उतरण्यास मदतही केली. अनेकजण विमानातील आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन विभागाची यंत्रणा वाहनांसह दाखल झाली होती.

या विमानात प्रवास करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीदाराने याबद्दल माहिती देताना सांगितले की, विमानाची मागील चाक निखळले होते व ते आम्हाला धावपट्टीवर आढळून आले. त्याने हे देखील सांगितले की, विमान थांबण्याअगोदर विना चाकाचेचे ते पुढे जात राहिले. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.