हजारो फुट उंचावरून उडणाऱ्या विमानामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला विमान कंपन्या कायमच प्राधान्य देत असतात. परंतु प्रवाशांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे कोणताही मोठा प्रसंग उद्भवू शकतो. स्पाईसजेटच्या एका विमानानं फुटलेल्या खिडकीला चिकटपट्टी लावून उड्डाण केल्याची घटना घडली. ५ नोव्हेंबर रोजी मुंबई ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलेल्या स्पाईसजेटच्या विमानात हा प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशानं ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ नोव्हेंबर रोजी स्पाईस जेटच्या SG8152(VT-SYG) या विमानानं मुंबई ते दिल्ली दरम्यान उड्डाण केलं. परंतु यावेळी विमानाच्या काचेला गेलेल्या तड्याला चिकटपट्टी लावल्याचं हरिहरन शंकरन नावाच्या एका प्रवाशाच्या निदर्शनास आलं. “स्पाइसजेटच्या फ्लाईट SG8152(VT-SYG) ने मुंबई ते दिल्ली (5 नोव्हेंबर) उड्डाण केलं. फुटलेली खिडकी चिकटपट्टीनं जोडलेली होती. सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब नाही का? कुणी ऐकतंय का?,” अशा आशयाचं ट्विट शंकरन यांनी केलं.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो, असं स्पष्टीकरण त्यांच्या ट्विटवर स्पाईसजेटकडून देण्यात आलं. यावर शंकरन यांनी पुन्हा ट्विटच्या माध्यमातून स्पाईसजेटला सवाल केला. फुटलेल्या खिडकीला चिकटपट्टी लावण्यात आली होती. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना फुटलेल्या काचेबद्दल माहित होतं. तरीही काच बदलण्यात आली नाही. दरम्यान, यावर पुन्हा स्पाईसजेटकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. काचेवर जो तडा होता तो आतील बाजूनं होता. बाहेरील बाजूच्या काचेला नुकसान होऊ नये यासाठी आतील काचेचा वापर होतो. ती काच त्याच दिवशी नीट करण्यात आली, असंही स्पाईसजेटनं म्हटलं आहे. स्पाइसजेटच्या या ट्विटनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger tweet finds spicejet flight broken window in plane jud
First published on: 08-11-2019 at 12:03 IST