एकीकडे नेसलेचे मॅगी नूडल्स ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून बाजारात फेरप्रवेश करत असतानाच सोमवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली प्रॉडक्टस’च्या ‘पतंजली आटा नूडल्स’ची विक्री औपचारिकपणे सुरू झाली. देशातील किरकोळ विक्री दुकानांसोबतच, विविध मॉल्समध्ये पतंजली आटा नूडल्स सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बाजारातील इतर नूडल्सपेक्षा आपल्या उत्पादनाचा दर्जा चांगला आणि किंमत कमी असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या काही दिवसांपासून पतंजली आटा नूडल्सची चर्चा सुरू होती. औपचारिकपणे हे उत्पादन बाजारात कधी दाखल होणार, याबद्दलही चर्चा सुरू होती. रामदेव बाबा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल अधिकृत माहिती दिली. ७० ग्रॅमच्या पतंजली आटा नूडल्सची किरकोळ विक्री किंमत १५ रुपये इतकी ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिसे आणि एमएसजीचे अतिरिक्त प्रमाण यामुळे जूनमध्ये सरकारने मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, आपल्या उत्पादनामध्ये शिशाचा वापरच करण्यात आलेला नाही, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. त्याचबरोबर हे नूडल्स शरीराला कोणतीही हानी करणार नसल्याचे ते म्हणाले. ‘झट पट पकाओ, और बेफिक्र खाओ’ अशी या नूडल्सची टॅगलाईन ठेवण्यात आली आहे.
अनेक राज्यांमध्ये मॅगी नूडल्स ग्राहकांसाठी पुन्हा उपलब्ध झाले आहे. आता पतंजली आटा नूडल्समुळे मॅगीला स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.