हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याने पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, या हल्ल्यामागे भारत-पाक चर्चेत खंड पाडण्याचे उद्दिष्ट नसल्याचे त्याने स्पष्ट केले. भारत-पाक चर्चेशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. पठाणकोट येथील भारतीय वायुदलाच्या तळावर चढवलेला हल्ला आमच्या संघटनेच्या नेहमीच्या कारवायांचा भाग असल्याचे सय्यद सलाहुद्दीन याने ‘वजूद’ या ऑनलाईन ऊर्दू मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. भारत-पाक चर्चेत खंड पाडण्यासाठी पठाणकोटच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला, हे साफ चूक आहे. हिजबुल मुजाहिद्दीन गेली २६ वर्षे भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचे काम करते आहे. पठाणकोट हल्लाही त्याचाच एक भाग होता, असे सय्यदने सांगितले.
यावेळी सय्यदने नवाज शरीफ यांच्या काश्मीरबाबतच्या धोरणावरही टीका केली. भारताशी चर्चा करताना पाकिस्तानने काश्मीरमधील पीडित जनतेच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत भारत-पाक चर्चेच्या १५० पेक्षा अधिक बैठका झाल्या असतील. मात्र, या चर्चांमध्ये काश्मीरसारख्या मुलभूत मुद्द्याचा एकदाही समावेश झाला नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाची फसवणूक करून काश्मीरवरची लष्करी पकड घट्ट करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी भारताकडून या निरर्थक चर्चेचे नाटक सुरू ठेवण्यात आल्याचा आरोपही यावेळी सय्यद सलाहुद्दीनने केला.