अहवालांमध्ये परस्परविरोधी दावे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणातील आरोपी व विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैय्याकुमार याला पतियाळा न्यायालयात आणत असताना काही वकिलांनी पत्रकार, विद्यार्थी तसेच आरोपी कन्हैय्याकुमार याला मारहाण केली होती. या प्रकरणाबाबत विविध अहवाल मिळाले असून त्यात परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी १० मार्चला घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची व्याप्ती वाढवण्यास नकार देतानाच केवळ १५ फेब्रुवारीला घडलेल्या हल्ल्याच्या घटनेचीच सुनावणी केली जाईल, असे न्या. जे.चेलमेश्वर व  ए.एम. सप्रे यांनी सांगितले. कारकरडूमा बार असोसिएशनच्या वतीने वकिलांनी हस्तक्षेपाची मागणी केली असता न्यायालयाने सांगितले, आम्ही इतर घटनांबाबत सुनावणी करणार नाही. १५ फेब्रुवारीला पतियाळा न्यायालयात जे घडले त्याचीच दखल घेतली जाईल. दिल्ली पोलिस, बार कौन्सिल ऑफ इंडिया व दिल्ली उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार तसेच सहा वकिलांचे पथक यांनी आज सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अहवाल सादर केले. या अहवालांमध्ये आरोप प्रत्यारोप आहेत, त्यामुळे त्यावर कुणाला काही आक्षेप असतील तर नोंदवावेत; त्यानंतर १० मार्चला सुनावणी घेण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले. बार असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे की, हिंसक घटनांत सामील असलेल्या वकिलांच्या प्रस्तावित चौकशीबाबत न्यायालय काय कारवाई करणार आहे ते सांगण्यात यावे. त्यावर न्यायालयाने सांगितले की, आज सादर झालेले अहवाल संबंधित पक्षकारांना दिले जातील, त्यानंतर आम्ही काहीतरी सांगू शकू.

महाधिवक्ता रणजित कुमार व अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले की, अहवालातील माहिती उघड करू नये कारण त्याचा दिल्ली उच्च न्यायालयात कन्हैय्याकुमार याच्या उद्या सुनावणीस येणाऱ्या जामीन अर्जावर परिणाम होऊ शकतो. दिल्ली पोलिसांच्या वतीने अजित कुमार सिन्हा यांनी सांगितले की, विधी अधिकाऱ्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे.  कारकरडूमा बार असोसिएशनने या प्रकरणी वकिलांना बकरा केल्याचे सांगून पक्षकार करण्याची मागणी केली, न्यायालयाने ही विनंती फेटाळताना सांगितले की, इतर घडामोडींवर आम्ही सुनावणी करणार नाही.