पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. हार्दिकचे वडील भारत पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बालपणीची मैत्रिण 25 वर्षीय किंजल हिच्यासोबत तो लग्न करणार आहे.

26 आणि 27 जानेवारी असे दोन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे. 26 जानेवारी रोजी एका छोटेखानी कार्यक्रमानंतर 27 जानेवारी रोजी अत्यंत साधेपणाने हे लग्न होणार आहे. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबाकडून 50-50 जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

किंजल ही मूळ वीरमगास येथील रहिवासी आहे, पण आता त्यांचं कुटुंब सुरतला वास्तव्यास आहे. हार्दिक देखील मूळ वीरमगास येथील चंदन नगरी या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. सुरेंद्र नगर जिल्ह्यातील दिगसर गावातील हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरातच हे लग्न होणार आहे. पण या गावात प्रवेश करण्यास कोर्टाने हार्दिक पटेलला बंदी घातली आहे, त्यामुळे लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किंजल ही हार्दिकची बहीण मोनिका हिच्यासोबत शाळेत होती. ती वरचेवर हार्दिकच्या घरी यायची. तिथंच तिची हार्दिकशी ओळख झाली. कालांतरानं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून सध्या गांधीनगरमधील एका लॉ कॉलेजातून एलएलबी करतेय.

पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता. शनिवारी कोलकत्यात झालेल्या विरोधकांच्या महासभेलाही हार्दिक पटेल उपस्थित होता.