शस्त्रक्रिया म्हटली की कोणत्याही रुग्णाच्या पोटात गोळा येतोच. थोडीशी का होईना भीती वाटतेच.. मात्र जयपूरच्या नारायणा रूग्णालयात मेंदूवरची शस्त्रक्रिया सुरु असताना रुग्ण हनुमान चालीसा म्हणत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नारायणा रुग्णालायात ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन करण्यासाठी दाखल झालेल्या या रुग्णावर शस्त्रक्रिया सुरु होती, त्यावेळी रुग्ण हनुमान चालीसा म्हणत होता. याप्रकारच्या शस्त्रक्रियेला ‘अवेक सर्जरी’ म्हटले जाते. बिकानेरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय हुलास मलला मागील तीन महिन्यांपासून भोवळ येण्याची समस्या त्रास देत होती.

हुलास मल या रुग्णाची बायोप्सी करण्यात आली. ज्यामध्ये त्याच्या मेंदूत ग्रेट टूचा ट्युमर असल्याचे समजले. हा ट्युमर मेंदूच्या अशा भागात होता जिथे थोडा जरी धक्का लागला असता तरीही हुलास मलची वाचा गेली असती. काही रुग्णालयांनी याच कारणामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे नाकारले. शस्त्रक्रिया केल्यास तुमची वाचा जाईल आणि तुमच्या शरीराचा एक भाग लुळा पडेल अशी भीती काही रुग्णालयातल्या डॉक्टरांनी बोलून दाखवली. त्यानंतर हा रुग्ण नारायणा रुग्णालयात आला. तिथे त्याच्यावर अवेक सर्जरी करण्यात आली. अवेक सर्जरीमध्ये शरीराच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे तोच भाग भूल देऊन बधिर करतात. त्याचमुळे त्याच्या बोलण्यावर परिणाम होऊ न देता त्याचा ट्युमर काढता आला.

रुग्ण जागा असताना फक्त डोक्याकडील भाग बधिर करुन त्यातून ट्युमर बाहेर काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. एरवी ब्रेन ट्युमर काढताना रुग्णाला पूर्ण भूल दिली जाते ज्यामुळे तो बेशुद्ध होतो. मात्र त्यावेळी जर सर्जरी करण्यात आली तर त्यात रुग्ण बोलू शकतोय की नाही हे समजू शकत नाही. अवेक सर्जरीमध्ये हा रुग्ण हनुमान चालीसा म्हणत होता. त्यामुळे त्याची वाचा जाणार नाही याची काळजी डॉक्टरांना घेता आली.

हनुमान चालीसा म्हण, गाणं म्हण, आमच्याशी बोल हे या रुग्णाला डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे तो बोलत राहिला, गात राहिला. त्याचमुळे डॉक्टरांना त्याची वाचा न जाता त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात यश आले. सुमारे तीन तास ही सर्जरी सुरु होती. अत्याधुनिक मायक्रोस्कोप लावून या रुग्णाच्या मेंदूतील ट्यूमर काढण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधी जुलै २०१७ मध्ये बेंगळुरु येथील एक माणूस शस्त्रक्रिया सुरु असताना गिटार वाजवत होता. त्यामुळे त्याला असलेली न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या डॉक्टर दूर करू शकले. ब्राझिलमध्ये मारिया फिलोमेना ही महिलाही तिच्या सर्जरी दरम्यान गाणं म्हणत होती. तिची वाचा जाऊ नये याच उद्देशाने तिला गाणे म्हणण्यास सांगण्यात आले होते. तर न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलेल्या एका सर्जरी दरम्यान रूग्ण सॅक्सोफोन वाजवत होता.