जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पाटणा एम्सच्या डॉक्टरांनी कन्हैय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाण आणि असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर डॉक्टर कामबंद आंदोलन सुरू करण्याच्या पवित्र्यात होते, मात्र एफआयआर दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं आहे. याउलट ज्या व्यक्तीची भेट घेण्यासाठी कन्हैय्या रुग्णालयात पोहोचले होते, त्यांनी सर्व आरोप फेटाळले असून डॉक्टरांनीच कन्हैय्या आणि त्याच्या सहकाऱ्यांसह दुर्व्यवहार केला असा आरोप केला आहे.

कन्हैय्या कुमार आपल्या समर्थकांसह ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे नेता सुशील कुमार यांची भेट घेण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. एकाचवेळी अनेक जण आल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश देण्यास मज्जाव केला. त्यावेळी कन्हैय्याच्या सहकाऱ्यांनी सुरक्षारक्षकाला धमकावलं आणि त्याच्यासोबत मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय डॉक्टर आणि नर्सेससोबतही त्यांची वागणूक असभ्य होती असाही आरोप आहे. दुसरीकडे, एम्समध्ये उपचारांसाठी भरती असलेल्या सुशील कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. याउलट केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या समर्थकांवर त्यांनी आरोप केला असून काही भाजपा समर्थक डॉक्टरांनी एम्समध्ये सुरू असलेले माझे उपचार बंद करण्याची धमकी दिली असल्याचं म्हटलं आहे. 6 ऑक्टोबरपासून मी रुग्णालयात दाखल आहे, पहिल्या दिवसापासून मला भेटायला येणाऱ्या लोकांसोबत रुग्णालय प्रशासनाची वगाणूक असभ्य होती, तसंच जाणूनबुजून माझ्या उपचारात दिरंगाई केली जात होती. एका खास विचारधारेच्या लोकांनी लक्ष्य करुन हे सर्व घडवलं असा आरोप सुशील कुमार यांनी केला आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कन्हैय्या कुमार मला भेटण्यासाठी आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केला आणि तेथे गोंधळ झाला. सुदैवाने कन्हैयाच्या सोबत असलेल्या पोलीस अंगरक्षकांनी मध्यस्ती केल्यानंतर डॉक्टर निघून गेले, अशी माहिती सुशील कुमार यांनी दिली.