प्रख्यात ब्रिटिश लेखक ई. एम. फॉस्टर यांनी ‘अ पॅसेज टू इंडिया’मध्ये पूर्वेकडचे केम्ब्रिज म्हणून ज्या महाविद्यालयाचा गौरवाने उल्लेख केला आणि ज्याचे विस्तीर्ण आवार आणि दृष्टिसौंदर्यात भर घालणारी भव्य वास्तुरचना यांचे प्रतिबिंब सत्यजीत रे यांच्या ‘सीमाबद्ध’ चित्रपटामुळे सर्वदूर पोहोचले त्या ‘पाटणा कॉलेज’ची स्थिती ‘बडा घर पोकळ वासा’ अशीच झाली आहे. गुरुवारी दीडशेव्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या या महाविद्यालयाचा शैक्षणिक पाया तर खचलाच आहे, पण अवाढव्य वास्तूची चौकटही धोक्यात आली आहे.
शतकभरापूर्वी ज्या महाविद्यालयाच्या वास्तूतील मार्गिका या वास्तूशास्त्राच्या सौंदर्यामुळे भारदस्त वाटत होत्या त्यांना आता डागडुजीअभावी अवकळा आली आहे. एकेकाळी ज्या महाविद्यालयाच्या परिसरात शैक्षणिक वातावरण होते आणि सामाजिक जाणिवांनी प्रेरित होणाऱ्या उपक्रमांची रेलचेल होती त्या आवारातली पूर्वीची ती जादूच जणू ओसरली आहे.
या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी देशातील विविध क्षेत्रांत आपला दमदार ठसा उमटवला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिन्हा, ब्रिटिश सरकारने ‘सर’ पदवी देऊन गौरविलेले शिक्षणतज्ज्ञ गणेश दत्त सिंह, ‘बिहार विभूती’ म्हणून लौकिक असलेले शिक्षणतज्ज्ञ, बिहारच्या अर्थकारणाला वळण लावणारे बुजूर्ग काँग्रेस नेते डॉ. अनुराग नारायण सिंह, प्रख्यात हिंदी कवी रामधारी सिंह ‘दिनकर’, मोइनुल हक, आणीबाणीविरोधी लढा चेतवणारे जयप्रकाश नारायण, भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मुचकुंद दुबे हे याच महाविद्यालयात शिकले होते. सर यदुनाथ सरकार, के. के. दत्ता, व्ही. एच. जॅकसन असे बिनीचे प्राध्यापकही येथे शिकवून गेले.
या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे मन पूर्वीच्या आठवणींनी आणि महाविद्यालयाच्या सध्याच्या स्थितीने हेलावून जाते. इतिहासतज्ज्ञ आणि लेखक सुरेंद्र गोपाल यांनाही या महाविद्यालयातील दिवस आठवून भारावून जायला होते. या वास्तूत अनेक मौल्यवान शिल्पकृतीही आहेत आणि त्यांची निगादेखील नीट राखली जात नसल्याने शिल्पकलेचाही मोठा वारसा अस्तंगत होत आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. गोपाल यांनी १९व्या शतकातील पाटणा, या विषयावर लिहिलेल्या ग्रंथात या महाविद्यालयाचेही स्मरणरंजन आहे. गंगेच्या काठावर असलेल्या गुलाबपुष्पांच्या बागा, काही वसतिगृह आणि खेळाच्या मैदानांमधोमध असलेल्या रेखीव बागाही आज भकास झाल्या आहेत. या महाविद्यालयाचे पूर्वीचे वैभव खंगत चालले आहे, अशी वेदना गोपाल यांनी व्यक्त केली आहे.