अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी प्रतिनिधिगृहाचे सभापती पॉल रायन यांनी पाठिंबा दिला आहे. अगोदर त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. आमच्यात मतभेदापेक्षा अनेक मुद्दय़ांवर मतैक्य आहे असे रायन यांनी सांगितले आहे.
गॅझेट एक्स्ट्राच्या ऑप एडिट पानावर लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटले, की ट्रम्प यांनी ज्या कल्पना मांडल्या आहेत त्यावर कायदे करून लोकांचे जीवन सुधारणे शक्य आहे, त्यामुळे मी ट्रम्प यांना पाठिंबा देत आहे. ट्रम्प यांची अध्यक्षीय उमेदवारीतील घोडदौड जोरात असली तरी त्यांना रिपब्लिकन पक्षात अंतर्गत पाठिंबा मिळणार की नाही यावरून चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, कारण रायन यांनी आपला ट्रम्प यांनी पाठिंबा नाही असे एकदा म्हटले होते. आता त्यांनी सांगितले, की काही मतभेद असले तरी बऱ्याच मुद्दय़ांवर आमचे मतैक्य झाले आहे. आमच्यात मतभेद आहे यात शंका नाही. तसे ते नाहीत अशी ढोंगबाजी करणार नाही, जेव्हा गरज भासेल तेव्हा मी विषयपत्रिकेतील प्रश्नांवर मते मांडेनच, पण या उन्हाळय़ात डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करणार आहे.