ई वॉलेट कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचा महत्त्वाचा डाटा चोरून त्यांच्याकडे २० कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेसह एकूण तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीही विजय शेखर शर्मा यांचा महत्त्वाचा डाटा चोरी केला आणि ती माहिती जाहीर करण्याची धमकी देत त्यांच्याकडून २० कोटींची खंडणी मागितली. मात्र या आरोपांखालीच या तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेली महिला विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती.

याप्रकरणातला चौथा आरोपी फरार आहे नोएडामध्ये ही घटना घडली आहे. या महिलेसह तीन कर्मचाऱ्यांना सेक्टर वीसच्या पोलिसांनी अटक केली आहे. गौतम बुद्ध पोलीस ठाण्यात विजय शेखर शर्मा यांनी त्यांचा डाटा चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी दिली. शर्मा यांनी या प्रकरणी तीन पथकं तयार केलं आणि खबऱ्यांनाही कामाला लावलं. पोलिसांच्या तीन पथकांनी अत्यंत शिताफीने विजय शेखर शर्मा यांच्या महिला सचिवाला अटक केली. महिला सचिवाला अटक करण्यात आली तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही पकडण्यात आले. या तिघांनी चोरलेली माहिती अत्यंत गोपनीय आणि शर्मा अडचणीत येऊ शकतात अशीच आहे. पोलिसांनी या तिघांनाही न्यायालयात हजर केले होते. आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत तसेच त्यांनी हा डाटा कसा चोरला याचीही माहिती पोलीस घेत आहेत.