ग्राहक मंचाने नथूज स्वीट्स या दुकानाच्या मालकाने वाईट दर्जाचे लाडू पुरवल्याबद्दल १ लाख रुपये भरपाई दक्षिण दिल्लीतील महिला ग्राहकास देण्याचा निकाल दिला आहे. नवी दिल्ली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष सी.के.चतुर्वेदी यांनी सांगितले की, हे लाडू खाण्यायोग्य नव्हते. त्यामुळे ग्राहक मोनिका के. सप्रा यांना ९५८२० रुपये भरपाई म्हणून देण्यात यावे.

मंचाने म्हटले आहे की, या विक्रेत्यास आम्ही वाईट दर्जाचे लाडू पुरवल्याबद्दल दोषी ठरवत आहोत. ओपी फर्मने लाडूची किंमत २५९२० रुपये द्यावी व निमंत्रितांपुढे अपमान झाल्याने जो मनस्ताप झाला त्याबद्दल ५० हजार रुपये द्यावेत व दाव्याचा २० हजार रुपये खर्च भरून द्यावा.
श्रीमती सप्रा यांनी लाडूची ८० पाकिटे २२ सप्टेंबर २०१२ रोजी मागवली होती, ती ओपी फर्मच्या नथू स्वीट्स या दुकानातील होती. त्या लाडूसाठी त्यांनी २५,९२० रुपये मोजले होते व वाढदिवसासाठी त्यांनी हे लाडू खरेदी केले होते.
लाडूंची चव कडू तर होतीच पण त्याला कुजल्याचा वासही येत होता. त्यामुळे या महिलेने उत्पादकांकडे दाद मागितली तेव्हा त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी लाडूचे पाकीट प्रयोगशाळेत पाठवले व त्याचा अहवाल मिळवला. त्यात ते लाडू शिळे असल्याचे स्पष्ट झाले. नंतर या महिलेने त्यांना कायदेशीर नोटीस दिली व पैसे परत करण्यास सांगितले. ओपी फर्मने तसे करण्यास नकार दिला व मध्यस्थीचा पर्यायही स्वीकारला नाही. नंतर नवीन लाडू घेऊन त्याचा एक अहवाल या फर्मने अन्न प्रयोगशाळेकडून मिळवला व तो ग्राहक मंचास सादर केला पण मंचाने तो फेटाळून लावत शिळे लाडू विकल्याबद्दल दंड केला.