बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतच्या निधनाचं वृत्त कळताच चाहत्यांबरोबरच संपूर्ण कलाविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांना ही बातमी कळाल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. पण, अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारच्या पाटणा येथील असून, मुंबईतील वांद्रे परिसरात तो एकटाच राहायचा. सध्या पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्यांकडे घटनेबद्दल चौकशी करत आहे. तर, पाटणामध्ये निधनाचं वृत्त धडकल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह हे पाटण्यातच राहतात. त्यांना फोनद्वारे सुशांतच्या मृत्यूची वार्ता कळाली. तेव्हापासून त्यांना जबर धक्का बसला आहे. तर, कुटुंबीयांचाही आक्रोश सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त समजल्यानंतर त्याच्या बिहारमधील घराबाहेर रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.


सुशांत सिंह याने अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सगळेच स्तब्ध झाले आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्येही त्याचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. काई पो चे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या सुशांतने त्यानंतर ‘एम.एस. धोनी’, ‘केदारनाथ’,छिछोरे’ , ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण, त्याने अचानक मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.