आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी आज पहिल्यांदाच त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केले आहेत. पी चिदंबरम यांनी आपण आपल्या कुटुंबीयांना ट्विट करण्याची मुभा देण्यात आल्याचे म्हटले आहे. या अकाऊंटवरुन चिदंबरम यांचे म्हणणेच त्यांचे कुटुंबीय मांडत आहेत.

पी चिदंबरम म्हणतात..

” लोक मला विचारु लागले आहेत की तुम्हाला नेमकी अटक कोणत्या कारणासाठी झाली? ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण तुमच्यापर्यंत आणलं, ज्यांनी शिफारस केली, त्यांना अटक झाली नाही आणि तुम्हाला अटक झाली कशासाठी झाली ही कारवाई? फक्त याचसाठी की त्या सगळ्याला तुम्ही स्वाक्षरी देऊन मान्यता दिली, निव्वळ या एका कारणासाठी तुम्हाला अटक झाली आहे का?” असे मला लोक विचारत असल्याचे चिदंबरम यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात “लोक जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्याचे माझ्याकडे काहीही उत्तर नाही. मात्र मला वाटत नाही की कोणत्याही अधिकाऱ्याने काही चूक केली आहे. कुणालाही अटक केली जाऊ नये” असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांची रवानगी तिहार येथील तुरुंगात करण्यात आली आहे.

तिहार तुरुंगात सध्या १७४०० कैदी आहेत, त्यातील १४००० कच्चे कैदी आहेत. तिहार तुरुंगात याआधी संजय गांधी, जेएनयू नेता कन्हैय्याकुमार, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, उद्योगपती सुब्रतो रॉय, छोटा राजन, चार्ल्स शोभराज, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांना ठेवण्यात आले होते. निर्भयाकांडातील आरोपीही तिहार तुरुंगात आहेत.